भरधाव कारची झाडाला धडक ; एकाचा मृत्यू तर तिघे जखमी
सचिन धानकुटे
सेलू : – भरधाव कार गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात थेट झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास बोरधरण येथे घडली. रोहण शेखर सातपुते(वय२५) रा. हिवलीनगर, नागपूर असे अपघातातील मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयताळा नागपूर येथील अमित बंडू सायरे आपल्या मित्रांसोबत एमएच ३१ सिएन ७२३५ क्रमांकाच्या आल्टो कारने प्रविण सुरेश सायरे, अभिषेक संजय कामडी व रोहण शेखर सातपुते समवेत हिंगणी येथे लग्नपत्रिका देण्यासाठी आले होते. लग्नपत्रिका दिल्यानंतर सगळे आज सकाळी बोरधरण व्हाया नागपूरला जाण्यासाठी निघाले. दरम्यान बोरधरण येथील बोर टायगर रिसोर्ट जवळ त्यांच्या भरधाव कारसमोर गाय आडवी आली. तीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याशेजारच्या झाडावर जावून धडकली. ही धडक एवढी भिषण होती की यात कारचा समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर बराचवेळ कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याने यात रोहण शेखर सातपुते ह्याचा जागीच मृत्यू झाला तर अमित सायरे, प्रविण सायरे व अभिषेक कामडी असे तीन जण जखमी झालेत. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कारचालक अमित सायरे विरोधात सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.