कातीच्या कोंबड्यावर “डल्ला” मारणाऱ्यांची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा..! जप्त केले पंचवीस अन् रेकॉर्डला केवळ सातचं
कोंबडबाजारावरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात, टाकळीच्या सरपंचाचा आरोप
सचिन धानकुटे
सेलू : – येथील पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी(किटे) परिसरातील कोंबडबाजारावर कारवाई करण्यात आली होती. यावेळीच्या कारवाईत जवळपास पंचवीस कातीचे कोंबडे देखील जप्त करण्यात आलेत, परंतु कारवाईच्या चक्रव्यूहात केवळ सातचं कोंबडे दाखविण्यात आल्याने उर्वरित कोंबड्यांना पाय तर फुटले नाही ना..! अशी शंका टाकळी(किटे) येथील सरपंच मनोज तामगाडगे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोंबडबाजारातील “त्या” कातीच्या कोंबड्यावर “डल्ला” मारणाऱ्यांची सध्या अख्ख्या पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
सेलू पोलीस स्टेशन नेहमीच आपल्या वादग्रस्त कारवायांमुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असते. येथील पोलिसांनी जुगार पकडला तर कधी आरोपी गायब होतात, नाही तर जुगारातील मुद्देमाल गायब होतो. हिंगणी येथील जुगाराच्या कारवाईत देखील असेच काहीसे घडल्याची बोंबाबोंब अख्ख्या तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सेलू येथील जुगाराच्या कारवाईत देखील एका आरोपीला सोयीस्करपणे बाजूला सारून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यास नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात अडकविण्यात आले होते. सदर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती, परंतु त्यानंतर यसंदर्भातील कारवाईचे अद्याप तरी घोंगडे भिजत असल्याचेच चित्र दिसते.
मौजा टाकळी(किटे) परिसरात नुकतीच एका कोंबडबाजारावर कारवाई करण्यात आली. यात दोन मृत आणि २३ जिवंत कोंबडे असे एकूण २५ कोंबडे जप्त करण्यात आलेत. प्रत्यक्ष कारवाईत मात्र केवळ सातचं कोंबडे दाखविण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप टाकळीचे सरपंच मनोज तामगाडगे यांनी केला आहे. त्यादिवशी गावात एक वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि त्याठिकाणी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटारसायकलवर देखील यावेळी कारवाई करण्यात आली. यामध्ये एका शेतात गेलेल्या शेतकऱ्याची देखील मोटारसायकल असल्याचे सांगितले जाते. याप्रसंगी सरपंच महोदय स्वतः पोलीस ठाण्यात हजर होते. त्यांच्या डोळ्यादेखत जप्तीतल्या कोंबड्याचा अर्ध्या रात्री पोलीस वाहनातून प्रवास झाल्याचे त्यांनी “याची देही याची डोळा” बघितले. यावेळी त्यांना कोंबडे सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात ते कोंबडे कोंबडबाजारात कोंबड्यांच्या झुंजी खेळणाऱ्यांनाच विकल्याचा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. उर्वरित कोंबडे मात्र कापून तर खाल्ले नाहीत ना.. याविषयी सध्या अख्ख्या पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे जप्तीतल्या मुद्देमालांवर “डल्ला” मारणारे ते महाभाग कोण याविषयीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.