महाशिवरात्रीच्या पर्वावर बोर गंगा महाआरती; नदी तिरावरील शंकरजी देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम : महाशिवरात्री उत्सव समितीचे आयोजन
सचिन धानकुटे
सेलू : – महाशिवरात्रीच्या पर्वावर स्थानिक शंकरजी देवस्थानात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी सायंकाळी नदी तिरावर बोर गंगा महापूजा व महाआरती पार पडली.
महाशिवरात्री उत्सव समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक शंकरजी देवस्थानात दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास भव्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. यात भजनी मंडळानी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. सायंकाळी सात वाजता बोर नदीच्या तिरावर बोर गंगा महापूजा तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात महिलांनी उत्सफुर्तपणे सहभागी होत महाआरती केली. रविवारी दुपारी तीन वाजता दहीहंडी व काला तर सोमवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाशिवरात्री उत्सव समितीच्या सदस्यांनी दिली.