पोलिसांची धडपड अन् दिव्यांग रोहितला मिळाला रायटर ; अंध रोहितचे बीएच्या परिक्षेत घवघवीत यश

सचिन धानकुटे
वर्धा : – “लहरो से डरकर नौका पार नही होती, और कोशिश करनेवालो की कभी हार नही होती” नेमके हेच ध्येय उराशी बाळगत दिव्यांग रोहितने पोलिसांच्या मदतीने रायटर उपलब्ध होताच बीएच्या परिक्षेत घवघवीत असे यश संपादित केले. बीएच्या द्वितीय वर्षाच्या तीसऱ्या सेमिस्टरचा निकाल जाहीर होताच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या रोहितचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.
शहरातील रामनगर परिसरात राहणारा रोहित गणेश तिवारी हा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. परंतु अंगी शिकण्याची जिद्द असल्याने त्याने आपल्या अंधत्वावर मात करीत नुकतेच बीएच्या परिक्षेत घवघवीत असे यश प्राप्त केले. याआधीही त्याने दहावी आणि बारावीच्या परिक्षेत चांगले गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला हे विशेष… बीए द्वितीय वर्षाच्या तीसऱ्या सेमिस्टरला दिव्यांग रोहितला रायटरचं मिळत नव्हता, परंतु त्याच्या पालकांनी खचून न जाता याविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली. या माहितीची सायबर सेलने दखल घेतली, अन् रामनगर पोलिसांनी रोहितचे घर गाठले. त्याला परिक्षेसाठी लिहणाऱ्या रायटरची गरज लक्षात घेता शोधाशोध सुरू केली. याकरिता रामनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी सुनिता ठाकरे यांच्या सहकार्याने व महेश ठाकूर यांच्या मदतीने अखेर रोहितला रायटर मिळाला.
वरुड येथील खुशाल दिनकर भुतेकर ह्याने परिक्षेत रोहितच्या रायटरची भुमिका पार पाडली. नुकताच बीएच्या द्वितीय वर्षाच्या तीसऱ्या सेमिस्टरचा निकाल जाहीर झाला. यात दिव्यांग रोहितने ६२ टक्के गुण घेऊन घवघवीत असे यश मिळवले. दिव्यांग रोहितच्या यशाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन देखील केले. यावेळी रोहितचे वडील गणेश तिवारी सह पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते