अवकाळीसह वादळवाऱ्याचा प्रकोप..! दहा एकरातील केळीची बाग भुईसपाट, वीजेच्या खांबासह वृक्ष जमिनदोस्त, वीज पडल्याने बैलजोडी गतप्राण
सचिन धानकुटे
सेलू : – अवकाळी पावसासह वादळवाऱ्याने काल सेलू तालुक्यात चांगलेच थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घर तसेच गोठ्यावरील छप्पर, वीजेचे खांब, लहानमोठे वृक्ष आणि शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सेलू मौज्यात दहा एकरात असलेली केळीची बाग अक्षरशः जमिनदोस्त झाली असून शेतकऱ्याचे जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खापरी येथे वीज पडून एक बैलजोडी दगावली तर झाडे पडल्याने पावसानंतर बऱ्याच ठिकाणी वाहतूक व्यवस्था देखील काही काळ प्रभावित झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा सेलू येथील शेतकरी सुरेंद्र तुकाराम चंदनखेडे यांची वादळामुळे दहा एकरातील केळीची बाग अक्षरशः उध्वस्त झाली. केळीच्या बागेतील १४ हजार झाडांपैकी कापणीयोग्य अशी साडेआठ हजार झाडे वाऱ्याने उन्मळून खाली पडलीत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता सदर नुकसानीचा आढावा घेतला. शेतकरी चंदनखेडे यांनी केळीच्या बागेवर आजतागायत १२ लाख रुपयांचा खर्च केला असून वादळवाऱ्याने शेतकऱ्याचे जवळपास ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. खापरी(मुंगापूर) येथील शेतकरी संतोष बाकडे यांच्या शेतातील गोठ्यावर कालच्या पावसावेळी अचानक वीज कोसळली. यात त्यांच्या गोठ्यातील बैलजोडी जागीच गतप्राण झाली. यासोबतच ३० कोंबड्या, जनावरांचे वैरण आणि शेती साहित्य असे सगळे जळून खाक झाले. हिंगणी येथील बुथ क्रमांक १४ च्या वरील छप्पर कालच्या वाऱ्याने उडून गेले. याठिकाणी आज निवडणूक विभागाच्या वतीने नुकसानीचा आढावा घेण्यात आला. येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचा उघड्यावर ठेवलेला शेतमाल कालच्या पावसामुळे भिजलाच नाही तर वाहून देखील गेला आहे. सेलू-येळाकेळी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी लहानमोठी झाडे, वीजेचे खांब उन्मळून पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बराचकाळ प्रभावित झाली होती. रेहकी येथील राजू झाडे आणि सेलू येथील बंटी दुबे यांनी रस्त्यावर आडवी झालेली मोठी झाडे मशीनच्या सहाय्याने कापून रस्ता वाहतूकीसाठी पूर्ववत केला. बेलगांव येथील सूरज खोडके यांच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या गोठ्याचे संपूर्ण छत कालच्या वादळवाऱ्याने उडून गेले. यात गोठ्यातील कापसासह जनावरांचे वैरण पावसात संपूर्ण भिजले. धानोली(मेघे) परिसरातील आठ ते दहा जणांच्या घरावरील छप्पर हवेत उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळामूळे बऱ्याच ठिकाणी वीजेच्या खांबासह तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा देखील प्रभावित झाला होता. काही ठिकाणी उशिरा रात्री वीजपुरवठा सुरळीत झाला तर अनेक गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
काल अचानक आलेल्या वादळामूळे नियोजित कार्यक्रमांचा देखील मोठा बोजवारा उडाला. लॉनमधल्या खूर्च्या हवेत तरंगायला लागल्या तर स्वागतासाठी उभारण्यात आलेले प्रवेशद्वार आणि शामियाने देखील जमीनदोस्त झालेत. प्रशासनाने झालेल्या या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करीत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.