कान्हापूर येथे दिवसाढवळ्या घरफोडी ; ६८ हजारांचे दागिने लंपास

सचिन धानकुटे
सेलू : – कान्हापूर येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करीत ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेलू पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कान्हापूर येथील अजय नारायण येळणे हे गुरुवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजतापर्यतच्या काळात आपल्या शेतात गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. यात चोरट्यांनी सोन्याची चैन, कानातील बिऱ्या, दोन अंगठ्या व पोत असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. येळणे कुटुंबातील सदस्य शेतातून जेव्हा घरी परत आले, तेव्हा सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी सेलू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात भादंवि कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.