लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पुन्हा खटाखट पंधराशे..!
सचिन धानकुटे
सेलू : – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा आनंद एकूणच गगनात मावेनासा झाला आहे.
महाराष्ट्रातील महिला व मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याच्या उदात्त हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलैपासून अंमलात आणली. सदर योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या २१ ते ६५ वयोगटातील बहुतांश महिला पात्र ठरल्या आहेत. यातील पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला आणि दुसरा असा एकत्रितपणे तीन हजार रुपयांचा मोबदला सरकारने आधीच दिला होता. या महिन्याचा तीसरा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे चित्र आहे.