नाल्याच्या पूरात गाडीसह वाहून जाणाऱ्या तिघांना झाडाचा आसरा..! पोलीस विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून सुखरूप सुटका
सचिन धानकुटे
वर्धा : – पूराच्या पाण्यात वाहनासह वाहून गेलेल्या तिघांना चक्क झाडाचा आसरा घेत जीव वाचविण्यासाठी आकांत करण्याची पाळी आली. ही घटना समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाडी नाल्यात आज सकाळी घडली. यातील तिघांनाही पोलीस विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने सुखरूप बाहेर काढले आहेत.
समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाडी नाल्यास आज मुसळधार पावसामुळे पूर आल्याने पाणी पुलावरुन ओसंडून वाहत होते. यावेळी एमएच ४० एन ५८३४ या मालवाहू वाहनातून विलास शहाणे (वय४०) रा. जाम, हरीलाल बारेत (वय२६) रा. राजस्थान व रामकिसन गौतम (वय४५) रा. मध्यप्रदेश या तीन जणांनी पूराच्या पाण्यातून वाट काढली. दरम्यान त्याचं वाहन अचानक अंदाज न आल्याने नाल्याच्या पूरात पुलापासून काही अंतरावर वाहून गेले. त्यामुळे पाण्यातून वाहत जाणाऱ्या तिघांनाही आपला जीव वाचविण्यासाठी चक्क झाडाचा आसरा घ्यावा लागला. तिघेही मालवाहू वाहनातून लाहोरी येथून समुद्रपूरच्या दिशेने जात होते, यावेळी सदर घटना घडली.
याप्रकरणी माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगांवकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समवेत पीएसआय दरेकर, टेंभुर्णे, रोशन उईके, हनवटे सह पोलीस मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टीमने तत्काळ पूराच्या पाण्यात जात तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.
याप्रसंगी पोलीस विभागाच्या वतीने आपला अमुल्य जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यात जाण्याचं धाडस करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.