Breaking
ब्रेकिंग

मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण..! सखल भागातील घरात पुराचं पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

2 4 7 1 8 4

सचिन धानकुटे

सेलू : – तालुक्यातील बहुतांश भागात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर बहुतांश ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतातल्या पिकांना फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

   जिल्ह्यात हवामान विभागाने आजपासून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सेलू तालुक्यात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास सलग तीन तास पाऊस धो धो बरसला. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते. शहरातील वडगांव रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने परिसरातील अनेक घरांत तसेच दुकानात पावसाचं पाणी शिरलं. अशीच काहीशी परिस्थिती यशवंत चौकापासून तर पोलीस स्टेशन आणि रेहकी चौकापर्यंत कायम होती. शहरातील प्रभाग क्रमांक १३ च्या सखल भागातील अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं होत. प्रभाग क्रमांक १४ मधील दुबे ले-आऊटचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. याठिकाणी अनेकांची वाहन देखील पाण्यात तरंगत होती. पावसाच्या पाण्याचा फटका बसस्थानक परिसराला देखील बसला, येथील बसस्थानकांत जलतरण तलाव असल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळच्या सत्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पावसांत अचानक सुट्टी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

    नजिकच्या रेहकी येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे गावातील बहुतांश घरांत गुडघाभर पाणी साचले होते. पुराच्या पाण्यामुळे गावाशेजारील पपईची संपूर्ण बाग खरडून गेली. शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या पंढरपूर येथील भाविकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने या काठावरुन त्या काठावर नेण्यात आले. सदर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार स्वप्निल सोनवणे, तलाठी चेन्नूरवार आपल्या पथकासह गावात दाखल झाले. 

    सुरगांव येथील सूर नदीला आलेल्या पुरामुळे शंभर एकरांवर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याठिकाणी अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याने जिवनावश्यक वस्तू पाण्यात भिजल्या. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बऱ्याच नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा दुपारी तीन वाजेपर्यंत संपर्क तुटला होता. यात येळाकेळी ते सेलू मार्गावर असलेल्या बाभुळगांव, सुरगांव, रेहकी येथील पुलावरून गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. पवनार ते सुरगांव, वडगांव ते रेहकी, कामठी ते अंतरगांव मार्ग बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. समॄद्धी महामार्गा लगतच्या बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने त्यातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. तहसीलदार सोनवणे स्वतः नुकसानीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट घेऊन परिस्थिती समजावून घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे