सुशांत”ची हत्या करणाऱ्या दोघांना अटक ; बुट्टीबोरीच्या एमआयडीसी परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात ; पैशाच्या देवाण-घेवाणीतून घडले हत्याकांड
सचिन धानकुटे
वर्धा : – “सुशांत”च्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बुट्टीबोरीच्या एमआयडीसी परिसरातून आज दुपारी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यातील आरोपींनी “सुशांत”ची पैशाच्या देवाण-घेवाणीतून धावत्या ट्रकमध्येच गळा आवळून हत्या करीत अपघाताचे कुंभाड रचण्यासाठी त्याचा मृतदेह चक्क रस्त्यावर फेकून दिला आणि त्यावरून ट्रक नेत आरोपी पसार झाले. राजूसिंग उर्फ शेरबहादूर रामलखन सिंग(वय४४) रा. इब्राहिम पेट्रोल पंप मालकाच्या घरी किरायाने बोरगांव(मेघे) व चंदन कलफनाथ कुमार(वय३४) पोस्ट सिंधोना, आजमगढ(उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नाव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासाच्या आत सदर गुन्ह्याचा छडा लावत यातील आरोपींना बेड्या ठोकल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामनगर परिसरातील सुशांत दिलीपराव येडाखे(वय३५) यांचा मृतदेह आज सकाळी तळेगांव(टा.) ते आष्टा रस्त्यादरम्यान आढळून आला होता. प्रारंभी सदर घटना अपघात जरी वाटत असली तरी यासंदर्भात कमालीची संभ्रमावस्था होती. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फीरवलीत. वर्धा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बुट्टीबोरी येथील एमआयडीसी परिसरातून आज दुपारी दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलू लागले. अवघ्या ५० हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीतून आरोपींनी सुशांतची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याचे चौकशीत पुढे आले.
आरोपींनी सुशांतला काल डि-मार्ट समोरच्या मोकळ्या जागेत भेटायला बोलावले. त्या ठिकाणी त्याची दुचाकी ठेवून त्याला ट्रकमध्ये घेऊन गेले. दरम्यान आरोपींनी त्याच्या तोंडाला टेप लावून त्याचा ट्रकमध्येच गळा आवळून खून केला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकल्यानंतर त्यावरुन ट्रक नेला. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रक देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ तासात करीत हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.