मोटारसायकली चोरणारी अट्टल टोळी गजाआड, चौघांना अटक ; सात वाहने जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल टोळीला गजाआड करण्यात नुकतेच यश आले. याप्रकरणी एका विधीसंघर्षीत बालकासह तीघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चार मोटारसायकल आणि तीन मोपेड देखील जप्त करण्यात आल्यात. कौशिक ब्रिजेश तिवारी रा. भिमलाईन, पुलगांव असे मोटारसायकल चोरट्याचे तर राहुल दादाराव जाधव रा. वडार झोपडपट्टी व गौतम कुंवरलाल मानेश्वर रा. बोरगांव(मेघे) असे “त्या” चोरीच्या मोटारसायकलींची विल्हेवाट लावणाऱ्यांची नावे आहेत.
पुलगांव परिसरात वारंवार होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटारसायकल चोरट्यांना शोधण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्तहेर नेमून चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. दरम्यान सहाय्यक फौजदार मनोज धात्रक यांच्या पथकाला चोरीची मोटारसायकल शहरातील दयालनगर परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे गेटसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी त्यांना दोन इसम एका मोटारसायकलसह संशयास्पद रित्या त्याठिकाणी आढळून आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ती मोटारसायकल पुलगांव येथून चोरल्याची त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोटारसायकली आणि तीन मोपेड अशी एकूण सात वाहने जप्त केलीत. यासोबतच त्या वाहनांच्या विक्रीसाठी मदत करणाऱ्या राहुल जाधव आणि गौतम मानेश्वर ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून आणखी काही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे संतोष दरेकर, अमोल लगड, रामदास खोत, मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, अक्षय राऊत, शिवकुमार परदेशी, गणेश खेवले आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.