तांब्याचा तार चोरणारी टोळी गजाआड ; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त ; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
सचिन धानकुटे
वर्धा : – मोटर रिवायंडीगच्या दुकानातील तांब्याचा तार चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड करीत त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत असे की, शहरातील स्नेहल नगरात उमेश वर्मा यांच्या मालकीचे मोटर रिवायंडीगचे दुकान आहे. सदर दुकानाचे ता. २३ मार्चच्या मध्यरात्री दरम्यान शटर तोडून जवळपास १५० किलो तांब्याचा तार चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना त्यांनी सावंगी(मेघे) येथील शांतीनगर परिसरातून चेतन सुकलाल ठाकरे(वय२५) रा. मंगरुळ दस्तगीर यास याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याने सोहेल उर्फ कचरा बासेद जुला(वय२७) रा. अशोकनगर, बार्शी नाका, बीड जो हल्ली मुक्कामाला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे आहे, त्यासमवेत सदरचा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी दोघांचीही सखोल चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ येथील मोहम्मद मतीन मोहम्मद अशरफ(वय४४) यास सदर तांब्याचा तार विकल्याने त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला तांब्याचा तार, चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, तीन मोबाईल व एक कार असा एकूण ५ लाख ६२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, श्रीकांत खडसे, प्रदिप वाघ, नितीन इटकरे, रामकिसन इप्पर आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.