पुलगांव येथील “महेश अग्रवाल”च्या तांदळाच्या गोडाऊनवर धाड ; ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – पुलगांव येथील महेश शामलाल अग्रवाल नामक व्यापाऱ्याच्या तांदळाच्या गोडाऊनवर पोलिसांनी काल गुरुवारी छापा टाकत तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीघांना अटक करीत त्यांच्याकडून तीन ट्रकसह जवळपास ८८ हजार १५५ किलो तांदूळ जप्त करण्यात आला. वर्धा पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर शासकीय तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील साठेबाजांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पुलगांव येथील महेश शामलाल अग्रवाल यांच्या तांदळाच्या गोडाऊनवर धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी सिजी ०८ एएच ६६६४ क्रमांकाच्या ट्रकचा चालक कोमलकूमार हरिराम साहू (वय३३) रा. रामपूर, जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड व ट्रकचा मालक डोंगरगड येथील अनुपसिंग भाटीया यांच्या ट्रकमध्ये एकूण ३१ हजार ५४० किलो तांदूळ, एम एच ३० एव्ही ०४२० क्रमांकाच्या ट्रकचा चालक नरेश चंफत आंबेकर (वय४३) रा. शांतीनगर, वर्धा व ट्रकचा मालक आशिष उल्हास चोरे, वर्धा यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये २५ हजार ७२० किलो तांदूळ आणि सिजी ०८ एई ५४११ क्रमांकाच्या ट्रकचा चालक किशोर कोंडू चौधरी (वय३५) रा. राजोली, ता. अर्जुनी मोरगांव, जिल्हा गोंदिया व ट्रकचा मालक कुलदिपसिंग चरणजितसिंह भाटिया रा. राजनांदगाव, छत्तीसगड यांच्या ट्रकमधून ३० हजार ८९५ किलो तांदूळ असा एकूण तीनही ट्रकमधला ८८ हजार १५५ किलो तांदूळ जप्त करण्यात आला. यावेळी जप्त करण्यात आलेल्या तांदळाची किमंत १५ लाख ८६ हजार ७९० रुपये तसेच तीनही ट्रक प्रत्येकी दहा लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये असा एकूण ४५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीनही ट्रकच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुलगांव पोलीस अधिक तपास करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे, रोशन निंबाळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, प्रशांत आमनेरकर आदि कर्मचाऱ्यांनी केली.