वर्धा पोलिसांची कोंबड्यांच्या झुंजीवर बेधडक कारवाई, आठ आरोपींना अटक आणि २८ जणांवर गुन्हा दाखल ; १६ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक पोलिसांनी कोंबड्यांच्या बाजारावर बेधडक कारवाई करीत जवळपास १६ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज गुरुवारी पोलिसांनी दिली. यात इंद्रपाल राजू भोसले रा. पांढरकवडा बेडा, निलेश केवटे रा. वर्धा, पवन धुळे रा. पोलीस क्वार्टर समोर, वर्धा, सुभाष सहारे रा. अंजनगाव, रोशन सांगोळकर रा. सेलू, सतीश पवार रा. वायफड, अमित नाकाडे रा. फुलफैल, आतिश मसराम रा. बुरड मोहल्ला, वर्धा अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा पांढरकवडा शिवारातील एका शेतात इंद्रपाल नामक इसम कोंबड्यांची झुंज लढवून त्यावर अनेकजण हारजीतचा जुगार खेळत असल्याची कुणकुण पोलिसांना काल बुधवारी लागली. त्यानुसार दुपारी एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी मोक्कास्थळी फिल्मीस्टाईल धाड टाकली. यावेळी २३ वाहने, ३४ हजारांची रोख रक्कम, ९ कोंबडे, पाच कोंबड्यांच्या काती व आठ आरोपी पोलिसांना घटनास्थळी मिळून आले. याप्रकरणी जवळपास १६ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सावंगी पोलीस ठाण्यात २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अमोल लगड, नरेंद्र पाराशर, गजानन लामसे, सचिन इंगोले, राजेश तीवसकर, रितेश शर्मा, अमरदिप पाटील, नितीन इटकरे, रामकिसन ईप्पर, संघसेन कांबळे, गोपाल बावणकर, मिथुन जिचकार, मंगेश आदे, अरविंद इंगोले, चालक गणेश खेवले आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.