Breaking
ब्रेकिंग

भावी आमदारांच्या गुडघ्याला बाशिंग..! वर्धा विधानसभा मतदारसंघात “एक अनार सौ बिमार”

2 6 9 1 4 6

सचिन धानकुटे

वर्धा : – विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना भावी आमदारांनी विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली. वर्धा विधानसभा मतदारसंघात तर “एक अनार सौ बिमार” अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी डझनभर भावी आमदार आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येते.

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा विधानसभा मतदारसंघात अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. अनेक हवसे, गवसे आणि नवसे आपापल्या परीने कामाला लागले आहेत. एरव्ही पाच वर्षांत शोधूनही सापडणार नाहीत असे काही नेते सध्या सोशल मीडियावर सक्रिय झालेत. काही सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यापासून तर काहींनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात घर करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. काही स्वयंघोषित नेत्यांनी तर निवडणुकीच्या अनुषंगाने आपापली संपर्क कार्यालयं देखील थाटली आहेत. 

   वर्धा विधानसभा मतदारसंघावर सध्या महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या परीने दावा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक पक्षात एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे आहेत. गेल्या दोन निवडणुकीत त्यांनी सलग विजय प्राप्त केला. त्यामुळे साहजिकच त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्यांच्याच पक्षातील अभ्युदय मेघे गेल्या तीन वर्षांपासून आमदारकीची तयारी करीत आहेत. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आमदार डॉ पंकज भोयर यांना उमेदवारीसाठी चांगलीच कसरत करावी लागणार यात शंका नाही.

भाजपातीलचं आणखी एक निस्वार्थ समाजसेवक म्हणून उदयास आलेले सुरेश पट्टेवार यांना देखील भावी आमदारकीचे डोहाळे लागलेत.    

    महायुतीतील भाजपचा दुसरा सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गट यांनी सुद्धा या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ऑफर दिल्याच्या वावड्या सध्या उडवल्या जात आहे. महायुतीचा तीसरा सहकारी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, या पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे हे देखील आमदारकीसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना तसा आदेश देखील दिला. परंतु महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ नेमका कोणाच्या पारड्यात पडणार, त्यावरचं या भावी आमदारांचे गणित अवलंबून आहे.

     महाविकास आघाडीकडून ह्या मतदारसंघावर सध्या तरी काँग्रेसचा दावा मजबूत आहे. काँग्रेसचा उमेदवार येथे सातत्याने लढत आला, परंतु गेल्या तीन निवडणुकांत येथे काँग्रेसच्या पदरी पराभवचं आलायं. काँग्रेसकडून या मतदारसंघात शेखर शेंडे चवथ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आतुर आहेत. सलग तीनवेळा पराभूत झाल्याने पक्ष त्यांच्या उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेणार, हे येणाऱ्या काळात कळेलचं. याशिवाय काँग्रेसकडून शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, अंबिका हिंगमीरे आणि कॄषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम उर्फ बापू टोणपे देखील इच्छुक आहेत. याआधी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून प्रा सुरेश देशमुख २००९ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीतील जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा या मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून समीर देशमुख आणि कराळे गुरुजी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. महाविकास आघाडीतील तीसरा घटक पक्ष म्हणजे उबाठा गट हा सातत्याने या मतदारसंघात लढला आहे. आधी शाम गायकवाड आणि त्यानंतर रविकांत बालपांडे येथे सातत्याने निवडणुकीच्या रिंगणात होते. जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ असल्याने जागावाटपाच्या वाटाघाटीत एखादा मतदारसंघ त्यांच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. अशात ते वर्धा मतदारसंघावर दावा करणार यात शंका नाही. पक्षाच्या नेत्यांनी तशा आशयाचा ठराव देखील वरिष्ठांना पाठविला. शिवसेना उबाठा गटाकडून निहाल पांडे आणि रवींद्र कोटंबकार देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

     याव्यतिरिक्त वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ सचिन पावडे हे देखील पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो ते निवडणुक लढणार असल्याचे सांगितले जाते. त्यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या परीने तयारी सुरू केली आहे. याशिवाय जे प्रकाशझोतात नाहीत, परंतु ज्यांच्या मनी आमदारकीची मनिषा आहे, असे अनेक हवसे, गवसे आणि नवसे भावी आमदार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे वर्धा विधानसभा मतदारसंघात “एक अनार सौ बिमार” अशीच काहीशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे.

4/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे