जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पेंदेच्या अर्थलिला सुसाट : कारवाई करण्याची हिम्मत कधी दाखविणार CEO साहेब

किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्हा परिषदेच्या वतीने सध्या क्रीडा महोत्सव जोरात सुरू आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेंदे यांच्या अर्थ लिलाचे क्री़डा सामनेही जोरात सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र या कारभाराला रान मोकळे करून देत असल्याचेच चित्र सातत्याने समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कार्यकारी अभियंता पेंदे यांनी खरेदी केलेल्या भूखंडाच्या पट्ट्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात जोरात सुरू आहे.
मोजक्याच कनिष्ठ अभियंत्यांना हाताशी धरून बांधकामाचे अंदाजपत्रक वाढवून घेत त्यांच्यावरच कामाची जबाबदारी सोपवून कार्यकारी अभियंता पेंदे यांनी पोत्यांच्या दौडस्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदविणे सुरू केले आहे. शेरजे, वनस्कर, मलमकर हे बिनीचे शिलेदार पोती सांभाळायला तयारच आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांंनी निष्पक्षपणा दाखवून देण्यास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत वर्धा उपविभागीय कार्यालयासमोरील सिमेंटरस्त्याच्या कामाचे देयक तपासून पाहावे, त्यातील मोजणीपुस्तकाच्या पानावरील सहाव्या क्रमांकाची नोंद तपासून पाहावी, त्यात किती गोंधळ आहे, हे समजून येईल. काही चाड असेल तर हे काम एमबीतील नोंदीनुसार झाले किंवा नाही, हे कनिष्ठ अभियंत्यासह कार्यकारी अभियंता पेंदे यांना विचारावे, गरज असेल तर उपअभियंत्यांना विचारावे. जे कोणालाही कळते, ते यांना कळले पण पैशाच्या लोभासमोर वळलेच नाही.
सध्या पालकमंत्री जिल्ह्यात येण्याची वाट पाहीली जात आहे. त्यांच्याकडे या कागदपत्रांचा संच सोपवून त्यांना याबाबत काय कारवाई करणार, हे विचारण्याच्या तयारीत सामाजिक संघटना आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर वेगळ्या क्रीडा कौशल्याच्या स्पर्धा तर जिल्हा परिषदेच्या इमारतीतल्या बांधकाम विभागात वेगळ्याच क्रीडा कौशल्याच्या स्पर्धा, या दोन्ही बाबी विसंवादी आहेत.