आयपीएस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
वृत्तसंस्था/चेन्नई : – तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार ह्यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या सर्व्हिस पिस्तुलाने त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी का झाडली यासंदर्भात अद्याप कळू शकले नाही. ते २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम केले आहे. विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते.
ह्याच वर्षी, विजयकुमार यांनी कोयम्बतूर रेंजचे नवीन पोलीस उपमहानिरीक्षक(डीआयजी) म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती, जिथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून देखील काम केले. आता ज्या कोयम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामध्ये कोयम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि ६.४५ च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याला(पीएसओ) आपले पिस्तूल देण्यास सांगितले. सदर पिस्तूल घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी ६.५० च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात होते. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.