सहयोग बँकेच्या शाखेत रोकडचा ठणठणाट..! सायंकाळपर्यंत केवळ एकालाच मिळाली रक्कम
दोन शाखेतील रक्कम गोळा केल्यानंतर मिटला सेलूतील एका नगरसेवकाच्या पैशांचा तिढा
सचिन धानकुटे
सेलू : – येथील सहयोग मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेत दैनिक अभिकर्त्याने केलेल्या अफरातफरीमुळे चांगलाच गोंधळ उडाला असून सध्या या शाखेत रोकडचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. शहरातील एका नगरसेवकास काल आपल्या फिक्स डिपॉझिटच्या परताव्यासाठी तब्बल दिवसभर ताटकळत बसावे लागले. अखेर दोन शाखेतून रक्कम गोळा केल्यानंतर त्यांच्या पैशाची कशीबशी तजवीज करण्यात आली.
“अजय गई” नामक सहयोग बँकेच्या येथील दैनिक अभिकर्त्याने ग्राहकांचे पैसे गोळा करीत ते बँकेच्या शाखेत न भरता चक्क शेअर बाजारात उधळले. त्यामुळे खातेधारकांच्या बँकेच्या शाखेसमोर हक्काच्या पैशासाठी रांगा लागल्या आहेत. यावर एक तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला. त्या अभिकर्त्याचे वडिलांच्या नावाने असलेले घर गहाण ठेवून खातेधारकांना रक्कम परत करायची. परंतु सदर घराची कागदपत्रेच उपलब्ध झाली नसल्याने सगळे व्यर्थचं ठरले. पैशासाठी दिवसभर ताटकळत बसलेल्यांना अखेर आल्यापावली परत जावे लागले.
दरम्यान येथील शाखेत शहरातील एका नगरसेवक महाशयांची पाच लाखांची फिक्स डिपॉझिट होती. त्यांनी देखील ती मोडण्यासाठी काल दिवसभर शाखेत ठिय्या दिला. यावेळी त्यांच्या रक्कमेवर १४ टक्के जीएसटीसह बँकेची फी लागणार असल्याचे कळताच, त्यांनी व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले. आधी बँकेचा जीएसटी क्रमांक सांगा, तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पैसे कापूच शकत नाहीत, तुमच्या शाखेची जिल्हा निबंधकांकडे तक्रार दाखल करतो. असे ठणकावताच त्यांना त्यांची संपूर्ण रक्कम अखेर परत करण्यात आली. याकरिता बँकेच्या कर्मचाऱ्यांना दोन शाखेत पैशासाठी धावाधाव करावी लागली हे विशेष…