लग्नास नकार देणाऱ्या मामावर चक्क भाच्यानेचं उगारला सत्तूर ; जीवघेणा हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
किशोर कारंजेकर
वर्धा : – लग्नास होकार न दिल्याच्या कारणातून भाच्याने चक्क मामासह एकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री समुद्रपूरच्या भालकर वार्डात घडली. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सावंगी(मेघे) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक बब्बू नखवे(वय५५) व कमल रामभाऊ धुमार(वय४५) अशी जखमींची तर लक्की दिपक बढेल(वय१९) असे आरोपी भाच्याचे व जुगलकुमार उर्फ जुगनू मनोज मारवे(वय२२) असे दुसऱ्या हल्लेखोर आरोपीचे नाव आहे.
अशोक नखवे ह्यांच्या मुलीस आरोपी लक्की याने लग्नाची मागणी घातली होती. यासंदर्भात मामा अशोक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने गाढ झोपेत असलेल्या मामावर आधी पट्टयाने मारहाण करीत नंतर धारधार सुऱ्याने हल्ला चढवला. यावेळी ते भालकर वार्डातील देवीच्या मंदिरातील शेडखाली झोपून होते. दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक भाचा लक्की व त्याच्या सहकाऱ्याने सदर हल्ला केला. यावेळी बाजूलाच झोपून असलेल्या कमल ह्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. यात दोघेही गंभीर जखमी झाले.
यावेळी आरडाओरडा ऐकू आल्याने कोणीतरी पोलिसांना कल्पना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु आरोपी लक्की हा घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलिसांनी दोन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांत भाचा लक्कीसह जुगनू मारवे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना रविवारी अटक देखील करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.