हत्या प्रकरणात सोनेगांव (मुस्तफा) येथील तीघांना जन्मठेप
सचिन धानकुटे
वर्धा : – कारंजा तालुक्यातील सोनेगांव (मुस्तफा) येथील तीघांना हत्या प्रकरणात आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. श्यामसुंदर आनंदराव बन्नगरे, सुदर्शन बन्नगरे व अशोक धारपुरे अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कारंजा तालुक्यातील सोनेगांव (मुस्तफा) येथे सन २०१९ मध्ये शेतातील विहिरीवरुन पाणी घेण्याच्या वादात मधुकर सिराम यांची हत्या करण्यात आली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत विलास सिराम हा देखील गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात श्यामसुंदर बन्नगरेसह पाच जणांवर भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात एकूण १७ साक्षदार तपासण्यात आले. यातील महिला आरोपींना आज बुधवार ता.३० रोजी न्यायालयाने दोषमुक्त केले असून तीघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी पाच हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वेदिका आर पाटील यांनी कामकाज सांभाळले तर कारंजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अशोक सोनटक्के यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. सरकारी पक्षाकडून करण्यात आलेला यशस्वी युक्तिवाद आणि १७ साक्षदारांची साक्ष ग्राह्य धरत आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रॉय मॅडम यांनी तीनही आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली.