ब्रेकिंग

शिंदे गटाचा पक्ष संघटन आणि सेवा पंधरवडा : शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांची पत्रपरिषदेत माहिती

किशोर कारंजेकर

वर्धा : शिंदे फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्याचा दौर्‍यावर आहेत. त्याअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्धा जिल्हा कार्यकारिणी गठित केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणार्‍या सेवा पंधरवड्यात शिवसेनाही सहभाग घेत असून, पक्ष संघटन आणि सेवा पंधरवडा कार्यक्रम संयुक्त राबविणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी आज रविवार 18 रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

सराफ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत शिवसेनाही सक्रीय सहभाग घेत जिल्ह्यातील तालुका व गावात पोहोचून ग्रामीण, शेतकरी व सर्वसामान्यांची कामे निकाली काढणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे यासह 14 विभागनिहाय कामे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून आम्ही सेवा देणार असल्याचेही सराफ यांनी सांगितले.
यासोबतच पक्ष संघटन मजबुतीसाठी प्रत्येक तालुक्याचा दौरा करून लवकरच तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले. येत्या नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही भाजपा-शिवसेना संयुक्तरित्या लढणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष संघटनासाठी राज्याचा दौरा करणार असून नागपूर आणि अमरावती येथे येणार आहे. आम्हीही त्यांना वर्धा येथे येण्याचा आग्रह करून, असेही सराफ यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गणेश ईखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, दिलीप भुजाडे, माजी उपजिल्हा संघटक किशोर बोकडे, रवींद्र चव्हाण व नितीन देशमुख उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे