Breaking
ब्रेकिंग

अखेर सेलूकरांच्या शुद्ध पाण्याचा मार्ग मोकळा..! ऐतिहासिक जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे थाटात भूमीपूजन

2 6 7 9 5 3

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील बहुप्रतिक्षीत अशा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला. सदर योजनेमुळे सेलूकरांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलल्या जाते.

     केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सेलू शहरासाठी ४३.३२ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली. या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे भुमीपूजन खासदार रामदास तडस व आमदार डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायतचे गटनेता तथा पाणीपुरवठा सभापती शैलेंद्र दफ्तरी यांनी प्रास्ताविक करताना शहरात सध्या १५ विहीरीवरुन पाणी पुरवठा केला जात असून अमृत योजनेअंतर्गत दोन नव्या जलकुंभाची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले. यातील एका जलकुंभाची उंची २८ मिटर तर दुसऱ्या जलकुंभाची उंची २० मिटर असून अनुक्रमे २.४० लाख व २.८० लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. शहरात एकूण ६४.५४ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. यासोबतच बोरधरणापासून तर जल शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत थेट पाईपलाईन तसेच धरण परिसरात जॅकवेल, विद्युत डीपी, सोलर पॅनल बसविणे योजनेत समाविष्ट असल्याचे सांगितले. शहरात चार जलकुंभाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार असून संपूर्ण पाईपलाईन तसेच नळ कनेक्शन सुद्धा कात टाकणार असल्याचे यावेळी सांगितले. शहरात आधीच्या योजनेनुसार प्रत्येकाला दरडोई ६५ लिटर पाणी मिळणार होते, परंतु आता १३५ लिटर शुद्ध जल मिळणार असून सदर प्रकल्प १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. सेलूच्या इतिहासातील अविस्मरणीय अशा जल शुद्धीकरण प्रकल्पासाठी त्यांनी यावेळी खासदार रामदास तडस व आमदार डॉ पंकज भोयर यांच्यासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचे विशेष आभार याप्रसंगी व्यक्त केले.

        याप्रसंगी बोलताना आमदार डॉ पंकज भोयर यांनी तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला मान्यता दिल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. सदर योजना शहरात एकाचवेळी कार्यान्वित न करता टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करावी, कारण वर्ध्यात जे घडलं ते सेलूतं घडू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेलू परिसरासाठी ऐतिहासिक असा निधी उपलब्ध करून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भेदभावा संदर्भात बोलताना राज्य शासनाच्या निधीसोबतच नगरपंचायतच्या निधीचे देखील समसमान वाटप झाले पाहिजे अशी माफक अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांना पडलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी गावाचा विकास कसा होईल हा प्रश्नचं नाही, कारण “टायगर अभी जिंदा है..!” अशी मिश्कील टिप्पणी देखील केली. यावेळी उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा सुखद असा धक्का अनुभवायला मिळाला.

 या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तडस तर विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ पंकज भोयर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगराध्यक्षा स्नेहल देवतारे, उपनगराध्यक्ष रेखा खोडके, गटनेता तथा पाणी पुरवठा सभापती शैलेंद्र दफ्तरी, बांधकाम सभापती डॉ राजेश जयस्वाल, महिला व बालकल्याण सभापती रुखसार पठाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, नगरसेवक संदीप सांगोळकर, राजेंद्र मिश्रा, किशोर इरपाते, रामनारायण पाठक, दिनेश माहुरे, अशरफअली सय्यद, कविता काटोले, चंदा सावरकर, गिता रामगडीया, वरुण दफ्तरी, अनिल देवतारे, शब्बीर सय्यद, अशोक कलोडे, मुख्याधिकारी राजेश भगत आदि मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पाणी पुरवठा योजनेसाठी कागदी घोडे नाचविणारे नगरपंचायतचे कर्मचारी प्रशांत रहांगडाले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन संजय चौधरी यांनी तर आभार मुख्याधिकारी राजेश भगत यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 7 9 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे