व्यापाऱ्याची गुंडागर्दी..! बाजार समितीत शेतकऱ्याची कॉलर पकडत धक्काबुक्की
सचिन धानकुटे
सेलू : – तलाठ्याने शेतकऱ्याविषयीचा राग अनावर झाल्याने खुर्ची फेकल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बाजार समितीच्या एका व्यापाऱ्याची शेतकऱ्या विरोधातील गुंडागर्दी चव्हाट्यावर आली. व्यापाऱ्याने पैशासाठी चक्क एका शेतकऱ्याची गचांडी धरत त्याला धक्काबुक्की केल्याची घटना काल गुरुवारी येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीहून पोलिसांत “त्या” व्यापाऱ्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धान्याचे भाव पाहण्यासाठी काल खापरी येथील शेतकरी स्वपनिल देवळीकर बाजार समितीच्या परिसरात गेले होते. यावेळी त्याठिकाणी कृषी मालाचा लिलाव सुरू होता. दरम्यान यावेळी व्यापारी नरेंद्र अग्रवाल यांनी “त्या” शेतकऱ्याच्या पाठीमागून येत त्याची गचांडी धरून त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे बाजार समितीत अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि कोणालाही काहीच कळले नाही की नेमके रामायण तरी काय घडले. यावेळी व्यापारी “नरेंद्र”चा रुद्रावतार पाहता त्यांचा शेतकऱ्यांविषयी असलेला रोष मात्र प्रकर्षाने जाणवला. अवघ्या काही वेळातच सदर राडा हा उधारीच्या पैशासाठी घडल्याची कुजबुज बाजार समिती परिसरात सुरू झाली.
एकंदरीतच शेतकऱ्याकडील उधारी वसूल करण्याची ही “पठाणी” पद्धत बाजार समितीच्या व्यापाऱ्याला शोभणारी नक्कीच नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापाऱ्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत, त्याच शेतकऱ्यांना जर अशा प्रकारची वागणूक दिल्या जात असेल, तर कधी काळी शेतकरी सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा असे काही घडेल तेव्हा व्यापाऱ्यांना पण पळता भुई थोडी होईल यात शंका नाही. त्यामुळे यानंतर निदान बाजार समितीच्या परिसरात तरी शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका
येथील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना याआधीही लाखोंचा गंडा घालण्यात आला. खरेदी केलेल्या मालाची फुटकी कवडी देखील अनेकांना अद्याप मिळाली नाही. म्हणून एखाद्या व्यापाऱ्याने त्या व्यापाऱ्यास गचाटगुचाट किंवा धक्काबुक्की केल्याचे ऐकीवात नाही, परंतु शेतकऱ्याला मात्र गचांडी धरत धक्काबुक्की केल्याने व्यापाऱ्यांविषयी संताप व्यक्त होत आहे.