गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त ; महसूल विभागाची कारवाई

सचिन धानकुटे
सेलू : – गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी तीन ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली. स्थानिक महसूल विभागाच्या वतीने येळाकेळी येथे सदर कारवाई करण्यात आली.
येळाकेळी येथील शासकीय जमिनीतून मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन होत असल्याची खात्रीशीर माहिती तहसीलदार सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी पाळत ठेवली असता, येळाकेळी येथील झोपडपट्टी परिसरात एम एच ३१ इक्यू ६५५५, एम एच ४० बिएल ३०५७ आणि एम एच ४० एन ७६११ अश्या प्रकारच्या क्रमांकाचे तीन ट्रक मुरुमाची चोरी करताना आढळून आले. सदर तीनही वाहनात प्रत्येकी दोन ब्रास याप्रमाणे एकूण सहा ब्रास मुरुम तसेच तीनही वाहने याप्रकरणी जप्त करण्यात आली. त्या तीनही वाहनांवर प्रत्येकी साठ ते पासष्ट हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
ही कारवाई तहसीलदार स्वपनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार के डी किरसान, मंडळ अधिकारी धनराज कुंटे, तलाठी गजानन सावळे आदि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.