तपास बोगस बियाण्यांचा अन् पोलिसांना आढळला हायप्रोफाईल मद्यसाठा ; दारुसाठा पाहून पोलिसही अवाक्

सचिन धानकुटे
वर्धा : – बोगस बियाण्यांच्या तपासकामी गेलेल्या पोलिसांना आज मुख्य आरोपीच्या घरात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी मुख्य आरोपीच्या पालकांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बोगस बियाणे प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व सेलू पोलीस ठाण्यातील कर्मचारी तपासकामी आज सकाळी रेहकी येथे गेले होते. त्यांच्या समवेत मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा देखील होता. यावेळी आरोपीच्या शेताची, कृषी केंद्राची तसेच घराची झडती घेण्यात आली. तेव्हा घराच्या मागे असलेल्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात हायप्रोफाईल विदेशी मद्यसाठा पोलिसांना आढळून आला. यात रेडलेबल, व्हँलेटाईनस, जिप्सी, अँब्सुलट व्होडका, व्हाईट वाईन, सुड्युस, १०० पायपरस व्हिस्की, ब्लेंडर प्राईड, ऑफीसर चॉईस, ऑफीसर चॉईस ब्ल्यू, बुम कंपनीच्या बियरच्या कॅन, ७५० एमएलचे बम्पर व ९० व १८० एमएलच्या शिश्या असा एकूण १ लाख ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस खरे तर तपास करायला गेले होते बोगस बियाणे प्रकरणाचा, मात्र ऐनवेळी त्यांच्या नजरेस हायप्रोफाईल मद्यसाठा पडल्याने ते देखील यावेळी थक्क झाले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी राजू जयस्वाल याच्या पालकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई एसआयटी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि सेलू पोलीस ठाण्यातील अखिलेश गव्हाणे, अमोल राऊत आदि कर्मचाऱ्यांनी केली.