धक्कादायक… कुटुंबियांनी घरातच पुरला मुलीचा मृतदेह ; आर्थिक विवंचनेतून घडला प्रकार
किशोर कारंजेकर
वर्धा : – दहा दिवसांपूर्वी स्वयंपाकघरात पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात सेवाग्राम पोलिसांना गुरुवारी यश आले. आजारी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसेचं नसल्याने पत्नी व मुलाच्या मदतीने घरातचं मृतदेह पुरल्याची धक्कादायक कबुली वडील साहेबराव भस्मे यांनी पोलिसांना दिली.
सेवाग्रामच्या आदर्श नगरात साहेबराव भस्मे हे आपल्या परिवारासह राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा प्रशांत(३६) आणि मुलगी प्रणिता(३८) असे चौघेही राहत होते. मृतक प्रणिता ही मानसिक रुग्ण होती. त्यामुळे तिला नेहमी रुग्णालयात दाखल करावे लागत होते. काही दिवसांपूर्वीच प्रणिताची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर तिला घरीही आणले. परंतु ता.४ जूलै रोजी तिचा अचानक मृत्यू झाला.
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील पैसे नसल्याने वडील साहेबराव भस्मे, भाऊ प्रशांत व आईने अश्या तीघांनी मिळून घरातच गड्डा करीत मुलीचा मुतदेह पुरविला. दरम्यान शेजाऱ्यांना आठ दिवसांपासून प्रणीता घराबाहेर न दिसल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे सदर माहिती शेजाऱ्यांनी सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांन घटनास्थळी भेट देत विचारपूस केली असता धक्कादायक प्रकार उजेडात आला.
जमिनीत पुरलेला मुतदेह बाहेर काढण्यासाठी न्याय दंडाधिकारी उपस्थित पाहिजे असल्याने तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, सेवाग्रामचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे आदि सर्व घटनास्थळी पोहचले. मुतदेह पुर्णत: कुजलेला असल्याने सेवाग्राम येथील फॉरेन्सिकचे टीम सुद्धा घटनास्थळी बोलविण्यात आली. सेवाग्राम येथील फॉरेन्सिकचे डॉक्टर झोपाटेसह त्यांची टीम ही घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाचा पंचनामा आणि शवविच्छेदन पोलीस तसेच तहसीलदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळीच करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला.