कान्हापूरच्या पुलावर “द बर्निंग ट्रक”चा थरार ; आगीत ट्रकची राखरांगोळी
सचिन धानकुटे
सेलू : – भरधाव ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण ट्रकची राखरांगोळी झाली. ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास बुट्टीबोरी-तुळजापूर मार्गावरील कान्हापूर जवळ घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रकचा मात्र संपूर्ण कोळसा झाला.
छत्तीसगड राज्यातील धमतीरी येथून एम एच ३२ एजे ४४५३ क्रमांकाचा ट्रक रेती घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातल्या ढाणकी येथे जात होता. सावंगी(मेघे) येथील शेख रहीम शेख करीम यांच्या मालकीच्या ट्रकचा चालक मोहम्मद शरीक मोहम्मद शफी रा. वाढोणा बाजार ता. राळेगांव, जिल्हा यवतमाळ हा सदर ट्रक घेऊन जात होता. दरम्यान भरधाव ट्रकने कान्हापूर जवळच्या पुलाच्या कठड्याला मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास धडक दिली आणि ट्रक थेट कठड्यावर विराजमान झाला. यावेळी झालेल्या स्पार्कींगमुळे ट्रकला भीषण आग लागली आणि त्या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. सदर घटनेच्या वेळी ट्रकमध्ये ९ ब्रास म्हणजे जवळपास ३४ टन रेतीचा साठा होता. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्यातील कर्मचारी अखिलेश गव्हाणे, अमोल राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहनास पाचारण केले. जवळपास रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, परंतु तोपर्यंत ट्रकचा कोळसा झाला होता. या घटनेतील ट्रक हा सहा महिन्यापूर्वीच खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जाते.