सेलूच्या “बारभाई” सार्वजनिक गणेशोत्सवाला १२४ वर्षाची परंपरा ; लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती स्थापना
सचिन धानकुटे
सेलू : – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते सन १८९९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या येथील “बारभाई” गणेश मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२४ वर्षाची परंपरा लाभली आहे. यंदाही येथे मोठ्या उत्साहात वाजतगाजत गणरायाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव काळात येथे विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सेलू शहरात एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील “बारभाई” गणेश मंडळाच्या उत्सवाचे हे १२४ वे वर्षे आहे. येथील गणेशोत्सवासाठी बाप्पाची मूर्ती देण्याकरीता सभासदांना जवळपास १३ वर्ष वाट बघावी लागते. यावर्षी मंडळाचे सदस्य ब्रिजकिशोर मिश्रा यांना बाप्पाची मूर्ती देण्याचा मान मिळाला. पुढील वर्षी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मंडळाचे सदस्य वरुण दफ्तरी यांच्याकडून बाप्पाची मूर्ती देण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
गणेशोत्सव काळात येथे विविध स्पर्धा तसेच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल, सौरभ सराफ, पवन राठी, शेखर राठी, अनिल चौधरी, शैलेंद्र दफ्तरी, ब्रिजकिशोर मिश्रा, वरुण दफ्तरी, योगेंद्र राठी, वैभव चौधरी, त्रिशूल चौधरी, जैनेंद्र दफ्तरी, युवराज राठी, अक्षय बेदमोहता, पंचारिया आदी सदस्य तनमनधनाने सहकार्य करीत आहे.