एमएससी परिक्षेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी राहुल भेंडे सन्मानित
सचिन धानकुटे
सेलू : – येथील डॉ आर जी भोयर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून एमएससीच्या परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राहुल बबनराव भेंडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा पदक व पारितोषीक वितरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी डॉ आर जी भोयर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एमएससी प्राणीशास्त्र विभागातून सर्वाधिक सरासरी गुण प्राप्त करणाऱ्या राहुल भेंडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना डॉ ए गोपालकृष्णा सुवर्णपदक तसेच प्रो.(श्रीमती) एम एस शास्त्री पारितोषीक लेफ्टनंट जनरल चीफ ऑफ स्टाफ दक्षिणी कमान मंजित कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राहुल भेंडे यांनी लाईफ सायन्सेस या विषयात गेट (GATE) आणि सेट ( SET) या दोन्ही परिक्षा एमएससी पूर्ण होण्याआधीच उत्तीर्ण केल्या आहेत. सध्या ते महाविद्यालयाचे डॉ आशिष टिपले यांच्या मार्गदर्शनात प्राणिशास्त्र विभागात पीएचडी करीत असून त्यांच्या संशोधनाचा विषय हा पतंग किटकांवर आधारित आहे आणि बऱ्याच किटकांवर त्यांचे शोधनिबंध प्रकाशित देखील झालेत. एमएससी प्राणिशास्त्र याव्यतिरिक्त एमएससी रसायनशास्त्र या विषयात देखील त्यांनी पदवी प्राप्त करीत रसायनशास्त्र या विषयात गेट (GATE) आणि सेट ( SET) या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.