सेलू तालुक्यात दहा दिवसांपासून मुद्रांकाचा तुटवडा ; विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांची गैरसोय
सचिन धानकुटे
सेलू : – गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात मुद्रांकाचा तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. येथील उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या खेळखंडोब्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.
शासकीय कार्यालयात विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांकाची म्हणजेच स्टॅम्प पेपरची नितांत आवश्यकता असते. परंतु गेल्या दहा दिवसांपासून सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेला मुद्रांकासाठी वणवण फिरावे लागत आहे. जिल्हा स्तरावर सुद्धा कालपर्यंत हीच परिस्थिती होती. येथील उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सेलूसह अन्य ठीकाणचा प्रभार असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. मुद्रांक हे नाशिकवरुन जिल्ह्यात येतात. ते मोठ्या प्रमाणात आले देखील, परंतु अनुक्रमांक, ऑनलाइन आणि डिस्ट्रीब्युशनच्या चक्रव्यूहातच अडकले आहेत. कालपासून वर्ध्यात मुद्रांक मिळायला लागल्याने सेलूच्या नागरिकांना मुद्रांकासाठी शहर गाठावे लागत आहे.
सिंदी येथील परिस्थिती देखील अशीच काहीशी आहे. तेथील मुद्रांक विक्रेत्याने मागील महिन्यात चालान तर भरली, परंतु त्याला अद्यापही उपकोषागार अधिकाऱ्यांनी मुद्रांक उपलब्ध करून दिले नाही हे विशेष.. एकंदरीतच मुद्रांकासाठी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.