रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सेलूत उदंड प्रतिसाद ; काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
सचिन धानकुटे
सेलू : – आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेचे आज सकाळी अकरा वाजता शहरात आगमन झाले. यावेळी युवा संघर्ष यात्रेचे बसस्थानक चौकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातशे किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेली युवा संघर्ष यात्रा शहरात दाखल झाली. यावेळी संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार राजू तिमांडे, संदीप किटे, बाजार समितीचे संचालक श्याम पाटील वानखेडे, काँग्रेसचे शेखर शेंडे, शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद, रामू पवार, अर्चित निघडे, नरेश खोडके, मनोहर निमजे, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, उद्योजक वरुण दफ्तरी, बालू मिरापूरकर, राजू दंढारे सह तीनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचे धिंडवडे काढत शासनाच्या धोरणांचे वाभाडे काढले. तसेच सेलू तालुक्यातील ज्वलंत मुद्याला ऐरणीवर आणत तालुक्यात एमआयडीसी स्थापन व्हावी, यासाठी केवळ मागणी नाही तर लढावं लागेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शासन रोजगार निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरले असून याकरिता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठीचं आम्ही सातशे किलोमीटर पायदळ संघर्ष यात्रेच्या माध्यमातून संघर्ष करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर संघर्ष यात्रा सभास्थळावरुन विकास चौकाच्या दिशेने निघाली. यावेळी काँग्रेस कमेटीसमोर नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, नगरसेवक रुखसार पठाण, संदीप सांगोळकर, किशोर इरपाचे, किशोर गुजर, हमिदअली सय्यद, बापूराव रोशनखेडे, काशिनाथ लोणकर, अब्बूभाई बेरा, मुन्ना देवतारे सह कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आमदार रोहित पवार यांचे पुष्पसुमनांनी स्वागत केले. यावेळी सगळ्यांनी संघर्ष यात्रेत हिरीरीने सहभागी होत पुढे प्रस्थान देखील केले. यावेळी तीनही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.