क्रेनचा बेल्ट तुटल्याने एकाचा जागीच मृत्यू ; एक जखमी
सचिन धानकुटे
सेलू : – क्रेनचा बेल्ट तुटल्याने त्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. सागर आनंद जगताप (वय१९) रा. धपकी(बेडा) असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील सिंदी-हेलोडी-तुळजापूर रेल्वे लाईनच्या तीसऱ्या व चवथ्या रेल्वे ट्रॅकचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याकरिता आज सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास लोहिया यांच्या शेतालगत ९ जण काम करीत होते. दरम्यान क्रेनच्या सहाय्याने मशीन उचलत असतानाच क्रेनचा बेल्ट तुटला आणि त्याखाली दबल्याने सागरचा जीव गेला. यावेळी कोटंबा येथील चेतन सावरकर हा देखील जखमी झाला. सदर घटनेनंतर तेथे काम करणाऱ्या कंपनीच्या इंजीनियर व आपरेटरने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान बेल्ट जुना असल्याने तो लावू नका असे कामगारांनी संबधितांना बजावले होते. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले अन् सागरला आपला जीव गमवावा लागला असल्याचे उपस्थित कामगारांनी सांगितले.