Breaking
ब्रेकिंग

सेलू शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात ; बसेसच्या मार्गात अतिक्रमणाचा अडथळा

1 9 7 0 1 6

सचिन धानकुटे

सेलू : – शहरातील मुख्य रस्ता हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने बसस्थानकात येणाऱ्या बसेसना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे नुकत्याच बसस्थानकात येत असलेल्या महामंडळाच्या बसेस पुन्हा शहराबाहेरुन धावणार..! यात तिळमात्र शंका नाही. याकडे संबधितांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

      सेलू शहरातील मुख्य मार्गावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. अनेकांनी आपली हद्द ओलांडून थेट रस्त्यावरच पसारा मांडला. त्यामुळे शहरातील बसस्थानकावर येणाऱ्या बसेसना तारेवरची कसरत पार करीतच बसस्थानक गाठावे लागते. आज सकाळच्या सुमारास शहरातील आसमा ट्रेडर्सच्या समोर उभ्या केलेल्या वाहनांमुळे बसला विनाकारण ताटकळत राहावे लागले. बसस्थानक ते माहेर मंगल कार्यालयापर्यंत देखील हीच अवस्था आहे. काहिंनी तर आपली जागा सोडून थेट रस्त्यावरच दुकानदाऱ्या मांडल्यात. वडगांवकडून येणारे कोणतेही वाहन माहेरकडे वळवायचे असेल तर बहुधा ते रस्ता दुभाजकावरचं चढते. कारण येथील दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने ते चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. एसबीआय बँकेच्या समोरील रस्त्यावर अतिक्रमण तर आहेच, शिवाय मुख्य रस्त्याचा वापर वाहनतळ म्हणून देखील केला जातो. याच रस्त्यावर एकाने तर चक्क गाड्या धुण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. वाहनांसोबतच तो रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांचीही धुवून देतो. 

    शहरातील मुख्य चौक असलेल्या मेडिकल चौकात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. येथे प्रवासी घेण्याच्या नादात ऑटो चालकांचा नेहमीच गोंधळ सुरू असतो. येथील अतिक्रमण आणि रस्त्यावर उभी असणारी वाहने नेहमीच बस चालकांसाठी डोकेदुखी ठरते. मेडिकल चौक ते उड्डाणपूला पर्यंतच्या रस्त्यावर छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे याठिकाणी भरधाव बसेस ह्या एकप्रकारे अपघातास निमंत्रणच देत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करीत अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्याला मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

नगरपंचायतीच्या तोंड पाहून नोटिसा

   येथील नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या नोटीस नुकत्याच बजावल्यात. परंतु “त्या” केवळ तोंड पाहून देण्यात आल्याचा आरोप यावेळी व्यावसायिकांनी केला. रस्त्यावर ज्यांनी अडथळा निर्माण केला, त्यांना नोटीस देण्याऐवजी ज्यांचा काही संबंध नाही, अश्याही व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे