दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर जखमी ; हिवरा फाट्याजवळील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास तालुक्यातील हिवरा फाट्याजवळ घडली. यातील जखमींना आधी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
हिवरा येथील विक्की खोडतकर(वय३२) हे आपल्या एम एच ३२ एयू १११० क्रमांकाच्या होंडा शाईन मोटारसायकलने झडशी येथून हिवराकडे जात होते. दरम्यान हिवरा येथून झडशीकडे जाणाऱ्या एम एच ३२ वाय ३९०१ क्रमांकाची मोटारसायकल आणि खोडतकर यांच्या वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली. सदर धडकेत हिवरा येथील आराध्या अर्जुन सोलंकी(वय०८) हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर तीचा भाऊ आदेश सोलंकी(वय१०) ह्याला किरकोळ स्वरूपाची इजा झाली. यासोबतच विक्की खोडतकर यांच्या पायाला गंभीर इजा झाली. सदर अपघातानंतर जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याचे सांगितले जाते.