“नुडल्स”चा नादचं खुळा..!धावपळीच्या नादात तरुणास दोन हजारांचा भुर्दंड

सचिन धानकुटे
सेलू : – “नुडल्स”ची हौस किती भारी पडू शकते, याचा प्रत्यय नुकताच येथील एका अतिउत्साही तरुणास आला. धावपळीच्या नादात त्याला चक्क दोन हजारांचा भुर्दंड सहन करावा लागला. यानंतर मात्र त्याने “नुडल्स”ची चव चाखायला चक्क दोन हजारांचा भुर्दंड सोसावा लागल्याची प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला.
टाकळी(झडशी) येथील एका युवकास अचानक “नुडल्स” खाण्याची हौस झाली. याकरिता तो आपल्या एम एच ३२ एस २१३२ क्रमांकाच्या मोटारसायकलने सेलूला आला. त्याने “नुडल्स”चा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर मात्र रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवले आणि धावपळीच्या नादात समोरुन येणाऱ्या एम एच ३१ एआर ५९०३ क्रमांकाच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात त्या वाहनाचे समोरील चाक पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आणि वाहनचालक देखील जखमी झाला. यानंतर मात्र तो घटनास्थळावरुन पसार झाला होता.
दरम्यान जखमी झालेल्या वाहनचालकाचे मित्रमंडळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धडक देणाऱ्या त्या वाहनाचा आणि चालकाचा यशस्वी शोध घेतला. त्याच्याशी संपर्क साधला आणि नुकसान भरपाई देणार का, पोलिसांत तक्रार करु अशी तंबी दिली. यावेळी मात्र त्याने नुकसान भरपाई देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
शेवटी धावपळीत धडक दिलेल्या त्याच वाहनाच्या दुरुस्तीपोटी त्याला तब्बल दोन हजार रुपयांचा खर्च देखील करावा लागला. यावेळी मात्र त्याने अतिउत्साहात “नुडल्स”चा नाद चक्क दोन हजारात पडल्याची प्रतिक्रिया देताना तेथून काढता पाय घेतला.