दीपचंदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या “त्या” विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका व शिक्षक खासदारांच्या हस्ते सन्मानित
सचिन धानकुटे
सेलू : – दीपचंदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या “त्या” चार विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे आणि विदर्भ भूषण पुरस्कार प्राप्त शिक्षक देविदास झाडे सरांचा नुकताच खासदार व आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार डॉ पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी येथील बसस्थानक परिसरात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार रामदासजी तडस, आमदार रामदास आंबटकर, तहसीलदार स्वपनिल सोनवणे, नायब तहसीलदार किरसान, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, शहराध्यक्ष ओमदेव सावरकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रामेश्वर धर्मुळ, गटनेत्या चंदा सावरकर, नगरसेवक दिनेश माहुरे, अशरफअली सय्यद, रामनारायण पाठक, गिता रामगडीया, नरेश पाठक आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे(वंजारी), विदर्भ भूषण पुरस्कार प्राप्त रेहकी येथील शिक्षक देविदासजी झाडे, हॉकीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या दीपचंदच्या लावण्या बावणे, प्राची कटरे, गौरव धानकुटे तसेच शासनाच्या राज्यस्तरीय कला उत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दीपचंदच्या रेहकी येथील सक्षम धानकुटे या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
यासंदर्भात सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, अनिल चौधरी, लक्ष्मीनारायण पिल्ले, शाळेचे पर्यवेक्षक विजय चांदेकर, मंकरंदे मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमा दरम्यान आयोजित आरोग्य शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे देखील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक असलेल्या ह्यात प्रमाणपत्रासह लाभार्थ्यांना योजनेत सहभागी झाल्याचे देखील प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.