आजी माजी सरपंच महोदयांचा सत्कार अन् पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन
सचिन धानकुटे
सेलू : – येथील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आणि तालुक्यातील आजी माजी सरपंच महोदयांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन भाजपच्या वतीने येत्या रविवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले आहे.
स्थानिक पंचायत समितीची इमारत जिर्ण झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात तर या इमारतीला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत होता. बऱ्याच विभागात पावसाचं पाणी गळायचं आणि महत्त्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजायचे, अशीच काहीशी परिस्थिती होती. परंतु वर्धा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉ पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून आता पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न देखील शेवटी निकाली निघाला. ह्याच इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी एक वाजता होणार आहे. यासोबतच तालुक्यातील आजी आणि माजी सरपंच महोदयांचा सत्कार सोहळा देखील येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आजी माजी सरपंच महोदयांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री खोडे, मंजूषा दुधबडे आणि अशोक मुडे यांनी केले आहे.