जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परिक्षा ; ५५ केंद्रावरुन १६ हजार ४५२ विद्यार्थी देणार परिक्षा ; केंद्र परिसरात कलम १४४ लागू
सचिन धानकुटे
वर्धा : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत जिल्ह्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. परीक्षा उत्तम पध्दतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागाने चांगली तयारी केली आहे. बारावीसाठी एकूण ५५ केंद्रांवरून १६ हजार ४५२ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आज शिक्षण विभागाने दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा आज ता.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. यासोबतच इयत्ता दहावीची परीक्षा ता. २ मार्च ते २५ मार्च यादरम्यान घेण्यात येणार आहे. बारावीसाठी १६ हजार ४५२ तर दहावीसाठी १५ हजार ९२४ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॅापीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरातील सर्व झेरॅाक्स केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची पोलीस पाटील, कोतवाल, शाळेचे कर्मचारी यांच्याद्वारे तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांद्वारे मुलींची तपासणी केली जाणार आहे.
परिक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके तसेच महसुल, पोलिस व जिल्हा प्रशासनाची संयुक्त वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. कॅापीमुक्त अभियान राबविण्यासाठी ही पथके कार्य करणार आहे. परीक्षेला प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील मुख्याध्यापक यांनी परीक्षा उत्तमपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या आहेत, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कळविले आहे.