Breaking
ब्रेकिंग

मतदानातून हिसका दाखवित केंद्र, राज्यातील सरकार बदलवा : राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन : वर्धेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

1 9 5 6 4 6

 

किशोर कारंजेकर

वर्धा : सध्याचे राज्यातील तसेच केंद्रातील सरकार सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत जनसामान्यांसह शेतकरी, युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महागाईने जनसामान्यांची प्रचंड होरपळ सुरू आहे. याकरीताच तुम्हाला सत्ता दिली काय, याचा संधी मिळेल तेथे जाब विचारा तसेच मतदानाच्या संधीतून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार बदलवा, दोन्ही राज्यात जनतेचे हित जपणारे नवीन सरकार सत्तेत आणा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्ध्यातील निर्धार मेळाव्यात केले.

रामनगरच्या मैैदानावर झालेल्या निर्धार मेळाव्याला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, रमेश बंग, बाबासाहेब वासाडे, राजाभाऊ टाकसाळे, राज्य सरचिटणीस अतुल वांदिेले, सुबोध मोहिते, सक्षणा सलगर, निता गजबे, सुरेखा देशमुख, अ‍ॅड.कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आज वेगळ्या परिस्थितीत आपण एकत्र आलो आहोत, राज्यातच काय पण देशात मी अनेकांसोबत बोललो, त्यावेळी जनसामान्यांच्या मनातील सरकारबद्दलची नाराजी स्पष्ट झाली. सत्तेचा गैरवापर तर खुलेआमपणे होत आहे. शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. शेतमालाचे भाव पडत आहेत. कापसाचे भाव पडत असताना यांनी विदेशातून कापसाची आयात करून कापसाचे भाव पाडले गेले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. जनसामान्यांना महागाईने जगणे कठीण करून देत सळो की पळो करून सोडले आहे, पण जनतेच्या समस्यांकडे सरकारला पहायला वेळच नाही. आताच पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले, माझ्या सोबत कोणी संघर्ष करू शकत नाही. बांगलादेशासारख्या लहान देशाने फळांवर आयातकर लादला, त्यातून महाराष्ट्रातील फळ उत्पादक संकटात आले, हे म्हणतात, माझ्यासोबत कोणी संघर्ष करू शकत नाही. यालाच तुमच्या सोबत संघर्ष करायची कोणाची हिंमत नाही, असे समजायचे काय, असा खोचक टोला शरद पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला तसेच त्यातून यांची देशाबाहेर यांची काय किंमत आहे, हे कळले. काळ्या मातीसोबत इमान राखायचे निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही. गांधीजींचा पदस्पर्श झालेला वर्धा जिल्हा ,पण या जिल्ह्यातही सगळ्यांच्याच समस्या वाढत आहेत. सत्तेचा गैरवापर तर नि:संकोचपणे सुरू आहे. अनेक विरोधकांना तुरुंगात डांबून त्याच्यावर दबाब टाकला जात आहे, त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकांवर १३० छापे टाकले. याकरीता तुम्हाला सत्ता दिली काय, हे विचारा आणि संधी मिळेल तेंव्हा यांना जागा दाखवा, अलीकडच्या काही निवडणुकांत मतदारांनी हे दाखवून दिलेच आहे. तोच निर्धार करीत पुढील काळात पावले टाका, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे पक्ष सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले. त्यांनी किमान दोन विधानसभा मतदारसंघात तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या यशाची ग्वाही दिली.

निर्धार मेळाव्यात सक्षणा सलगर, सुरेखा देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सुरेश देशमुख, आशा मिरगे यांनी विचार व्यक्त केले. मेळाव्याला जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 5 6 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे