मद्यसाठा पोहचता करून निघालेल्या भरधाव एनएक्सचा अपघात, दोन जण गंभीर जखमी : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना
सचिन धानकुटे
सेलू : – भरधाव एनएक्सला कट लागल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास शहरातील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर घडली. निखिल बाबाराव कोटंबकार(वय२६) व रामकिशोर पवार(वय२४) दोन्ही रा. घोराड अशी सदर अपघातात जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघातातील जखमी युवक आपल्या विना क्रमांकाच्या एनएक्स या रेसर बाईकने शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये विदेशी दारुचा साठा पोहचवून भरधाव निघाले होते. दरम्यान त्यांच्या बाईकला को-ऑपरेटिव्ह बँकेच्यासमोर एका मोटारसायकलचा अचानक हँडल लागला आणि दोघेही जमिनीवर कोसळलेत. यात त्यांंची बाईक रस्त्यावर दूरवर घासत गेल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्यांना तत्काळ रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर इजा असल्याकारणाने जखमी दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु तेथेही नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने अखेर सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर सदर अपघात घडल्याने तसेच अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांची गती बघता उपस्थितांत मात्र यावेळी आश्चर्य व्यक्त होत होते. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.