बीआरएसची अशीही पळवापळवी..! राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याने तालुकाध्यक्षाची काढली वरात
सचिन धानकुटे
सेलू : – महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पळवापळवी झाल्याचे एका घटनाक्रमातून नुकतेच उघडकीस आले. प्रसंग होता भारत राष्ट्र समितीच्या पक्षप्रवेशाचा अन् वाद झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांत, शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे चॉकलेट दिल्यानंतर थेट पक्षप्रवेशाचे वृत्त झळकले अन् सारा घटनाक्रम चव्हाट्यावर आला.
स्थानिक विश्रामगृहात नुकताच भारत राष्ट्र समितीचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर प्रवेश घेतला. वरील आशयाचे वृत्त जेव्हा वर्तमानपत्रात झळकले, तेव्हा मात्र मोठा भडका उडाला. शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रम असल्याचे सांगितले आणि कोणत्याही प्रकारची “कल्पना” न देता, चक्क पक्षप्रवेशाचा सोहळा पार पाडला. यावरून दोन महिला पदाधिकाऱ्यांत चांगलीच खडाजंगी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांने तालुकाध्यक्ष असलेल्या “त्या” पदाधिकाऱ्याचा असा काही खरपूस समाचार घेतला की, “माझे नाव टाकलेच कसे”, “कोणाला विचारले”, “कोणी सांगितले” असे एक ना अनेक सवाल उपस्थित केल्याने अखेर “त्या” पदाधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली. त्यामुळे “बीआरएसची अशीही पळवापळवी..” सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.