बालिकेवर अत्याचार करणारा मळणी यंत्रावरील मजूर गजाआड ; दोन दिवसांची पोलीस कोठडी
सचिन धानकुटे
सेलू : – मळणी यंत्रावर काम करणाऱ्या मजूराने बारा वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची घटना तालुक्यातील गावात नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होताच यातील आरोपी मजूराला गडचिरोली जिल्ह्यातील चुरमोरा ता. आरमोरी येथून ताब्यात घेण्यात आले. सूरज हेमराज कांबळे (वय२४) असे “त्या” नराधम मजूराचे नाव असून न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तालुक्यात सध्या हरभरा व गहू या पिकांच्या सवंगणी तसेच मळणीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील मजूर आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातील चुरमोरा येथील सूरज कांबळे हा देखील रोजमजूरीसाठी येथे आला होता. दरम्यान तो एका गावातील मळणी यंत्रावर कामाला होता. सोमवारी एका अंगणात खेळणाऱ्या बारा वर्षीय बालिकेला दुपारच्या सुमारास त्याने बळजबरीने शेतात नेऊन तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर पिडीता जेव्हा आपल्या घरी पोहचली, तेव्हा तीच्या आईने तीची घाबरलेली अवस्था पाहून चौकशी केली, परंतु सुरुवातीला तीने आईला काहीच सांगितले नाही. शेवटी तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तीने घडलेली आपबिती आईला सांगितली. सदर घटना उघडकीस येताच गावात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी सेलू पोलिसांत तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील आरोपी सूरज कांबळे हा घटनेनंतर लगेच गडचिरोली जिल्ह्यात पसार झाला होता. सेलू पोलिसांचे पथक लागलीच गडचिरोली जिल्ह्यात गेले व त्यांनी आरोपी मजूरास त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.