कारच्या धडकेत कान्होलीबारा येथील तिघे जागीच ठार ; मृतकांत दोन सख्ख्या भावांचा समावेश ; बोथली शिवारातील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – रस्त्यावर वाहन दुरुस्ती करत असतानाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास वर्धा-नागपूर मार्गावरील बोथली शिवारात घडली. मृतकात कान्होलीबारा येथील गणेश मनोहर लिडबे व महादेव मनोहर लिडबे या दोन सख्ख्या भावंडासह गावातीलच उज्वल सुनिल गव्हाळे यांचा समावेश असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्होलीबारा येथील तिघेही मालवाहू बोलेरो वाहनातून चण्याची पोती घेऊन नागपुरच्या दिशेने जात होती. दरम्यान त्यांचे मालवाहू वाहन वर्धा-नागपूर रस्त्यावरील बोथली शिवारात नादुरुस्त झाले. यावेळी त्यांनी ऍक्टिवाच्या उजेडात रस्त्यावरच वाहन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान ते रस्त्याच्या ज्या लेनवर वाहन दुरुस्ती करीत होते, त्याच लेनवर एम एच ४९ बीआर ५९५९ क्रमांकाच्या भरधाव कारने आधी ऍक्टिवाला व नंतर त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की यात ऍक्टिवा चेंडूसारखी हवेत उडाली. सदर अपघातात तिघांनाही गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी बुट्टीबोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे कान्होलीबारा येथे शोककळा पसरली आहे.