सेलूच्या द ग्रेट अशोका हॉटेलमध्ये गांजा तस्करी ; वाहनासह एकास अटक ; सहा किलो गांजासह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सचिन धानकुटे
सेलू : – हॉटेलच्या आडून गांजाची तस्करी करणाऱ्या येथील एकास मंगळवारी अटक करण्यात आली. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सव्वासहा किलो गांजा असा एकूण पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अनिकेत उर्फ सोनू अशोकराव दंढारे (वय २७) रा. सेलू असे अटक करण्यात आलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मंगळवारी गस्ती दरम्यान शहरातील एका हॉटेलमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहराबाहेरील नागपूर रस्त्यावर असलेल्या दंढारे फ्रुट कंपनी नजिकच्या “द ग्रेट अशोका” हॉटेलवर छापा टाकला असता तीथे एका कारमध्ये बसून आरोपी सोनू हा अंमली पदार्थ गांजाची विक्री करताना पोलिसांना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एम एच ०४ ईडी ९०३९ क्रमांकाची काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर, सहा किलो ३१५ ग्रँम गांजा, एक मोबाईल, अकराशे रुपये रोख असा एकूण ५ लाख ७४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल एनडीपीएस कायद्याअंतर्गत जप्त केला. याप्रकरणी अनिकेत उर्फ सोनू अशोकराव दंढारे ह्याच्या विरोधात सेलू पोलिसांत ८ (क), २० (ब) आदि कलमान्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आबूराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, मनिष कांबळे, पवन पन्नासे, रामकिसन ईप्पर, प्रदिप वाघ आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.