फ्रीजसह कारमध्ये आढळला देशी-विदेशी मद्याचा साठा, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नाचनगांव येथील एका घरातून फ्रीजमध्ये तसेच कारच्या डिक्कीत ठेवलेल्या देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी रोशन फगूलाल साहू (वय३८) रा. नाचनगांव ता. देवळी यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाचनगांव येथे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी धाड टाकली. यावेळी साहू यांच्या घरातील फ्रीजमध्ये तसेच कारच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी साहू यांची एमएच ३२ एएस ८६८८ क्रमांकाची क्रेटा कार, शिमला कंपनीच्या ११९, ओसी ब्ल्यू कंपनीच्या ५, आरएस कंपनीच्या ८, मॅकडॉल कंपनीच्या ३, गावठी मोहा दारुचा दहा लिटरचा कॅन, एक डीप फ्रिजर, एक डबल डोअर फ्रीज, एमएच ३२ एयू ४०३७ क्रमांकाची ऍक्टिवा, १९१८ पाण्याच्या बाटल्या, दोन कॅन आणि रोख ६ हजार दोनशे असा एकूण २१ लाख ३२ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोशन साहू यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोलीस हवालदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलास वालदे, सुगम चौधरी, प्रदीप कूचनकर यांच्यासह पोलीस मुख्यालयातील शिरीन शेख, पायल भोयर व वाहनचालक आशिष सावरकर आदिंनी केली.