बसच्या वाहकाची विद्यार्थ्यांना शिवीगाळच नव्हे तर मारहाणही ; “त्या” मुजोर वाहकावर कारवाईसाठी मनसेचे वाहतूक नियंत्रकांना निवेदन

सचिन धानकुटे
सेलू : – राज्य परिवहन महामंडळाच्या बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच शिवीगाळ आणि मारहाणीसारखे गंभीर प्रकार करणाऱ्या “त्या” मुजोर वाहकावर कारवाई करावी, याकरिता आज सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी स्थानिक वाहतूक नियंत्रकांना निवेदन दिले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बहुतांश शहराच्या ठिकाणी यावे लागते. याकरिताचा त्यांचा प्रवास हा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून होतो. यामुळे शालेय वेळातील बसगाड्या बहुदा हाऊसफुल्लचं असतात. अशीच धपकी येथून सेलू शहरात येणारी महामंडळाची बस नेहमीच फुल्लं असते. त्यामुळे साहजिकच या बसवरील महिला वाहकाचे कधी-कधी संतुलन ढासळते आणि “त्या” आपला राग विद्यार्थ्यांवर व्यक्त करतात. प्रसंगी विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील करतात. ही बाब विद्यार्थ्यांनी पालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आज चक्क काही पालकांनी सदर बसमधून प्रवास केला. यावेळी “त्या” मुजोर वाहकाने एका विद्यार्थीनीस मारहाण केल्याचा प्रकार पालकांसमोरच घडला.
त्यामुळे सदर बस ही सेलू येथे पोहचताच, बसस्थानकावर मोठा राडा निर्माण झाला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी “त्या” महिला वाहकास जाब विचारण्यात आला, परंतु त्यांनी यावेळी “वड्याचे तेल वांग्यावर” टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारच्या मुजोर वाहकावर तत्काळ कारवाई व्हावी, यासाठी आज मनविसेच्या नेतृत्वात स्थानिक वाहतूक नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. महामंडळ प्रशासनाने कारवाई न केल्यास प्रसंगी मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.