रसूलाबादच्या स्मृतीदिन सोहळ्याला सामाजिक बांधिलकीचा वारसा ; जिल्ह्यातील १३५ भजनी मंडळ दिंडी सोहळ्यात सहभागी, २३ हजार भाविकांनी घेतला पूरणपोळीचा महाप्रसाद
संदीप रघाटाटे
रसुलाबाद : – येथील श्री समर्थ सद्गुरु मनसागिर महाराजांच्या स्मृती दिन सोहळ्याला सामाजिक बांधिलकीचा वारसा लाभला असून गावातील सर्व समाजबांधव एकत्र येत मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात. यानिमित्ताने आयोजित दिंडी सोहळ्यात जिल्ह्यातील १३५ भजनी मंडळ सहभागी झाले होते. यासोबतच जवळपास २३ हजार नागरिकांनी दहा क्विंटलच्या पूरणपोळीचा महाप्रसाद घेतला.
स्मृतीदिन सोहळ्याप्रसंगी येथे भागवत कथा, हरिपाठ, काकडा आरती, भजन व कीर्तनासह अनेक प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील दिंडी सोहळ्यात यवतमाळ, अमरावती व वर्धा जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील १३५ भजनी मंडळ सहभागी झाले होते. याप्रसंगी संपूर्ण गावात जणू काही दिवाळी असल्यागत वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी व आकर्षक अशी सजावट केली होती. यावेळी श्रींच्या पालखीचे ग्रामस्थांकडून भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी श्रींच्या पालखीची पूजा करण्यात आली.
गावातील तरुणांनी जागोजागी चहा-नाश्ता व लंगरची व्यवस्था केली होती. गावाला प्रदक्षिणा घातल्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास दिंडी व पालखी सोहळा मंदिरात पोहोचला. याठिकाणी किर्तन व काला पार पडल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जवळपास २३ हजार नागरिकांनी दहा क्विंटलच्या पूरणपोळीचा आस्वाद घेतला. १२० महिलांच्या मदतीने या पूरणपोळ्या तयार करण्यात आल्या होत्या. दुपारी चार ते रात्री बारापर्यंत अविरतपणे २३ हजार भाविकांना पंगतीचे जेवण देण्यात आले. याप्रसंगी येथे सतत दोन दिवस मोठी यात्रा देखील भरली. यावेळी जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक, राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सरपंच, कर्मचाऱ्यांनी सुद्धा महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.