बांधकाम कामगारांच्या योजनांचा आचारसंहिता काळात बट्टयाबोळ, ऑनलाईन पोर्टल बंद झाल्याने लाभार्थी योजनांपासून वंचित
कर्मवीर बांधकाम कामगार संघटनेचे निवडणूक आयुक्तांना निवेदन
किशोर कारंजेकर
वर्धा : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांचे ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभचं मिळणार नाही, एखाद्या कामगाराचा यादरम्यान अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना लाभ कसा काय मिळणार, असा सवाल उपस्थित करीत कर्मवीर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्तांना सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परिणामी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टलला याचा फटका बसला. कामगारांच्या योजनांसाठी असलेले पोर्टल बंद करण्यात आले आहे.
यामुळे नवीन लाभ, नोंदणी व नुतनीकरणाचे अर्ज सध्या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारले जात नाही. यादरम्यान एखाद्या कामगाराचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या नुतनीकरणास बाधा निर्माण होवू शकते. त्या कामगारांचे वारस योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी ऑनलाईन पोर्टलला आचारसंहितेतून वगळावे, अशा आशयाचे निवेदन काल कर्मवीर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले.