माणिकवाडा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा..! हौदावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या बैलाचा करंट लागल्याने मॄत्यू
आरएनएन न्युज नेटवर्क
आष्टी : – हौदातील पाणी पिण्यासाठी गेलेल्या बैलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना माणिकवाडा येथील गावगोठाणाजवळ गुरुवारी रात्री घडली. बैलाचा ऐन शेतीच्या हंगामात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
माणिकवाडा येथील शेतकरी नारायण नामदेव दिग्रसे आपल्या बैलजोडीला काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास गाव गोठाणावरील हौदावर पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्याठिकाणी विजेच्या खांबावरुन स्ट्रीट लाईटसाठी खाली जमिनीवर उघड्या पडून असलेल्या विज तारेचा करंट लागल्याने एका बैलाचा मॄत्यू झाला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा एका बैलाच्या जीवावर बेतला, पावसाळ्याच्या दिवसात एखाद्या मनुष्याचा जर त्याला स्पर्श झाला तर जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून ऐन हंगामात बैल दगावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाकडून चौकशीअंती मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.