पावसाच्या आगमनासाठी गोंदापूरच्या नागरिकांचे वरुणराजाला साकडे ; धोंडी काढत नागटेकडीच्या मंदिरात केली पूजाअर्चा
सचिन धानकुटे
सेलू : – कपाशीची लागवड अन् सोयाबीनच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या आगमनासाठी शेतकरी वरुणराजाकडे साकडे घालत असल्याचे दिसून येते. गोंदापूर येथील ग्रामस्थांनी गावात धोंडी काढून नागटेकडी परिसरातील नाग मंदिरात शनिवारी पूजाअर्चा केली.
गेल्या तीन-चार दिवसाआधी झालेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या पेरण्या उरकल्या. परंतु तेव्हापासून अचानक पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट घोगावत आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे ते शेतकरी कसेबसे पीक वाचवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही वरुणराजावरचं आहे. त्यामुळे रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गोंदापुर येथील ग्रामस्थांनी शनिवारी धोंडी काढून वरुणराजाकडे पावसासाठी एकप्रकारे साकडेचं घातले. यावेळी ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून धोंडी काढत नागटेकडी शिवारातील नाग मंदिरात पावसासाठी पूजाअर्चा केली.
याप्रसंगी गोंदापुर येथील सुनिता बोरकर, शारदा बोरकर, पोलीस पाटील उषा बावनकुळे, नलू मुडे, केसर कुंभेकर, चंद्रकला ठोंबरे, सावित्री कामडी, गोवरा नागपुरे, शकुंतला बोरकर, लिला बोरकर, झुना सोलंकी, शकुन नागपुरे, वैशाली साठोणे, ममता साठोणे, चंद्रभागा नेहारे, कुसुम बोरकर, प्रेमिला बोरकर , निर्मला बोरकर, मीरा बोरकर, राधा बोरकर, अश्विनी बोरकर यांच्यासह गावातील युवक मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.